

हुबळी : पोलिसांवर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा दरोडेखोरांवर गोळीबार करून त्यांना अटक करण्यात आली. रविवारी (दि. २४) ही घटना घडली. दोघांच्याही पायाला गोळी लागून ते जखमी झाले. संशयितांनी केलेल्या हल्ल्यात तीन पोलिसही जखमी झाले.
कुर्ता ऊर्फ भरतकुमार आणि फारुक ऊर्फ टोमॅटो फारुक अशी दरोडेखोरांची नावे आहेत. दोघेही दरोडेखोर मूळचे मंगळूरमधील आहेत कार आणि इतर वाहने अडवून शस्त्रांचा धाक दाखवून ते लोकांना लुटत होते. ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी येथील स्टेशन रोडवर सांगलीतील राहुल सुर्वे यांची कार अडवून त्यांना लुटले होते. शस्त्राचा धाक दाखवून त्यांना धमकावले होते. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर ऐवज काढून घेतला होता.
याबाबत हुबळी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. एकूण १५ जणांची टोळी असून भरत आणि फारुक हे दोघेही त्याच टोळीतील आहेत. हुबळी-धारवाड पोलिसांनी त्यांचा माग घेऊन मंगळूर येथे अटक केली. रविवारी त्या दोघांसह पोलिस घटनास्थळी गेले. तेथे दोघांनीही पोलिसांवर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना गोळीबाराचा इशारा दिला तरी त्यांनी हल्ला करून फरार होण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या.
या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी चार विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कर्नाटक आणि केरळच्या दिशेने ती रवाना झाली आहेत. फारुकविरुद्ध २००१ पासून १६ खून, लूट आणि दरोड्याचे गुन्हे नोंद आहेत. भरतकुमारवर महामार्गावरील तीन लुटीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा आहे. ही टोळी मंगळूर, कारवार, बंगळूर अशा काही ठिकाणी दरोडे घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.