शनिशिंगणापूर येथे रविवारी (दि. 20) सायंकाळी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत तलवारी, काठ्या व दगडाने हाणामार्या सुरू झाल्या. दोन गटांतील रोष आणि आक्रमकता आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात येताच पोलिस निरीक्षक खगेंद्र टिंभेकर व कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन हवेत गोळीबार केला. यामुळे वातावरणात तणावपूर्ण शांतता पसरली. दरम्यान, या हाणामार्यांमध्ये पोलिस निरीक्षक टेंभेकर व कर्मचारी अजय ठुबे जखमी झाले.
दोन गटांतील टोळीयुद्ध सुरू असताना विपरीत घटना घडू नये याकरिता पोलिस पुढे येताच पोलिसांवर दगडफेक झाल्याचे समजते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून निरीक्षक टिंभेकर यांनी हवेत गोळीबार केला. यामुळे जमाव पांगला; पण या हल्ल्यात पोलिस अधिकारी टिंभेकर व ठुबे हे जखमी झाले. जमावातील चार जण जखमी झाले असून त्यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर मुख्य रस्त्यावर असणारे भाविक जीव मुठीत घेऊन पळाले. काही भाविक दर्शन न घेताच गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पूजासाहित्य विक्री व लटकूगिरीचा संबंध या घटनेत असल्याचे बोलले जात असून पोलिस कशा पद्धतीने गुन्हा दाखल करतात यानंतर नेमके कारण पुढे येईल. रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस माहिती जमा करीत असल्याचे समजते. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.