

बेळगाव : विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी शिक्षण खात्याकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, सरकारी शाळांत शिक्षकांची कायमस्वरुपी भरती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सध्या 1,643 जागा रिक्त आहेत. त्यामुळे, शाळांच्या गुणवत्तेसह निकालावरही परिणाम झाला आहे. राज्यात शिक्षकांच्या 18 हजार जागा भरणार असल्याचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा सांगत आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्यांने शाळांचा भार सध्या अतिथी शिक्षकांवरच आहे.
निवृत्ती, मृत्यू, अपघाती मृत्यू आदी कारणांमुळे राज्यांतील शाळांत सुमारे 50 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्या जागा शिक्षण खात्याने भरल्याच नाहीत. त्यामुळे, सरकारी शाळांतील दर्जा घसरत चालला आहे. पालक खासगी शाळांकडे ओढला जाऊ लागला आहे. काही शाळांतून विद्यार्थी संख्या आहे. मात्र, शिक्षक नाहीत अशी परिस्थिती शाळांतून आहे. त्यासाठी शिक्षण खात्याने शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
शिक्षण खाते शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लवकर घेणार आहे, असे सांगत आहे. टीईटी उत्तीर्ण उमेदवार सीईटीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सीईटी लवकर घेतली जात नसल्याने समस्या कायम आहे. शाळा शिक्षकांच्या तर बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षे आहेत. पण, शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली जात नसल्याने सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. शिक्षक भरती केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. तसेच शिक्षकांवरील भारही कमी होणार आहे. तर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. परंतु, सरकार केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, असे सर्वांचे म्हणणे आहे. सरकारने टोलवाटोलवी न करता भरती सुरु करुन सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहर ः 103
बेळगाव ग्रामीण ः 251
खानापूर ः 431
बैलहोंगल ः 142
कित्तूर ः 66
सौंदत्ती ः 325
रामदूर्ग ः 325
एकूण ः 1,643
राज्य सरकारने शिक्षक भरतीचा आदेश तातडीने काढावा. यासाठी सीईटी घेऊन सरकारी शाळांमधील अध्यापनाची समस्या दूर करावी. गेल्या अडीच वर्षापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. शाळांतून अतिथी शिक्षकांची नेमणूक करुन वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे, शिक्षणाचा शैक्षणिक दर्जा घसरत आहे.
- के. डी. पाटील, बीएड शिक्षक