

बेळगाव : महिला अधिकाऱ्याच्या घरात छुपा कॅमेरा बसवून त्यांचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. त्यांनी तब्बल शंभरहून अधिक खासगी क्षण रेकॉर्ड केले असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
जिल्हा पातळीवरील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या घरात बल्बच्या होल्डरमध्ये संवेदनशील कॅमेरा बसवून ते खासगी त्यांचे क्षण टिपत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानंतर त्या व्हिडिओंचा पुरावा म्हणून वापर करून त्यांनी लाखो रुपयांची मागणी संबंधित महिला अधिकाऱ्याकडे केली होती. जर रक्कम दिली नाही तर सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांनी पैसे उकळल्याचा आरोप आहे. महिला अधिकाऱ्याकडे त्यांनी 50 लाख रुपये मागितल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी समीर नजीरअहमद शेख (वय 32 रा. जलाल गल्ली गोकाक), अब्दुलरशीद नजीरअहमद मकानदार (वय 51, रा. योगीकोळ्ळ, ता. गोकाक), महंमददिलावर नजीरअहमद बाळेकुंद्री (वय 43, रा. घटप्रभा, ता. गोकाक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. माळमारुती पोलिसांनी त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तीन दिवसांच्या चौकशीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.