निपाणी; मधुकर पाटील : सुळकुड (ता. कागल) येथील दूधगंगा नदीवरून इचलकरंजीला सुरू होणाऱ्या पिण्याच्या पाणी योजनेला आता सीमाभागातील निपाणीतून मोठा विरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी दूधगंगा बचाव कृती समितीच्यावतीने झालेल्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीस काँग्रेसचे माजी आमदार वीरकुमार पाटील व राष्ट्रवादीचे उत्तम पाटील हे हजर राहिले होते. तर इतर नेते तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित नसले तरी या योजनेला एकजुटीने सर्वपक्षीय विरोध करण्याचे निश्चित झाले आहे.
काळम्मावाडी आंतरराज्य करारानुसार चार टीएमसी पाणी आमच्या हक्काचे असून ते मिळालेच पाहिजे, काळम्मावाडी ही सीमाभागाची रक्तवाहिनी आहे. त्यामुळे या योजनेला विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर नियोजित मोर्चासाठी हजर राहणार असल्याच्या भावना सीमाभागातील नेते मंडळींनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना वीरकुमार पाटील म्हणाले, सुळकुड येथील दूधगंगेतील पाणी इचलकरंजीला दिल्यास कर्नाटक सीमाभागातील पिण्याच्या पाणी योजनेसह शेती पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे दूधगंगा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देण्यास विरोध आहे. वास्तविक इचलकरंजीसाठी स्वतंत्र पाणी योजनेचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे असताना स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी वापरात येणारे खराब पाणी नदीत सोडून दुसऱ्याच्या नदीतून पाणी मिळविण्याची गरजच काय, अशा परिस्थितीत इचलकरंजीला दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणावरून पाणी योजना राबवण्याची आवश्यकता नाही. त्यांनी स्वतःमध्ये डोकावून पहावे, असे पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आ. काकासाहेब पाटील म्हणाले, सीमा भागातील जनतेला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी काळम्मावाडीच्या शाश्वत आंतरराज्य करानुसार ४ टीमसी पाण्यासाठी ३५ कोटी रुपये कर्नाटक सरकारने यापूर्वी दिले आहेत. अर्थात दूधगंगा बचाव कृती समिती या पाणी योजनेसंदर्भात जो निर्णय घेईल तो स्वीकारून या लढ्याला पाठिंबा देऊ, यासाठी या भागातील शेतकऱ्यांचेही पाठबळ राहिल, असे अश्वासन दिले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, निपाणी भागासाठी मुळातच पाणीटंचाई जाणवत आहे. भविष्यातही मोठी पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पिण्यासह शेतीच्या प्राण्याचा प्रश्न निर्माण होईल.
उत्तम पाटील म्हणाले, सुळकुड येथून दूधगंगेचे पाणी इचलकरंजी शहराला देण्याची मागणी होत आहे. पाणी दिल्यास कर्नाटक सीमाभागातील ६७ गावांना निरंतरपणे पाणीटंचाई जाणवणार आहे. दूधगंगेचे पाणी हे सीमा भागातील नागरिकांच्या हक्काचे पाणी आहे. त्यामुळे या योजनेला सीमा भागातील नागरिकांचा विरोध आहे. तरीही हे पाणी इचलकरंजीला नेण्याचा प्रयत्न केल्यास सर्वपक्षीय नेत्यांसमवेत आपण राजकीय गट- तट, पक्ष बाजूला ठेवून सहभागी होण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत आ.शशिकला जोल्ले या बाहेरगावी दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क होवू शकला नाही.
हेही वाचा :