

निपाणी : निपाणी शहर व उपनगरांत गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. दिवसाढवळ्याही पाळत ठेवून चोरीच्या घटना होत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाली असून शहरात चोर पुढे व पोलिस मागे असा प्रकार दिसून येऊ लागला आहे. वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलिस करतात तरी काय, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. शहर व उपनगरांत घरफोड्या, वाहने लंपास, वृद्धांचे पैसे लांबविणे तसेच चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. पोलिस मात्र वाहने अडवून हप्ते गोळा करत असल्याचा आरोप होत आहे. रात्रीची गस्त वाढविली तरच वाढत्या चोरीच्या घटना थांबणार आहेत.
शहर, ग्रामीण व बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यांबरोबर शहरात सीपीआय ऑफिस स्वतंत्र आहे. या तिन्ही पोलिस ठाण्यातील कर्मचारी शहराच्या विविध भागात राहतात. तरीदेखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कोणत्या उपाययोजना केल्या याची कोणतीच माहिती नागरिकांना मिळत नाही.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते सुरू करण्याकडे कानाडोळा का, असा सवाल विचारला जात आहे. याउलट पोलिसच नागरिक व व्यापार्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्या, असा सल्ला देतात याला काय म्हणायचे? गेल्या आठवड्यात अष्टविनायक नगरातील बंगला फोडून 22 तोळ्यांचे दागिने लांबविण्यात आले.
या आठवड्यात पंतनगरातील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडून दागिने व रक्कम लांबवली. सोमवारी सकाळी 11 वा. बिरदेवनगर व्यायाम शाळेजवळील सुनील वडगावे हे बँकेत पैसे काढण्यासाठी आपल्या आई व पत्नीला घेऊन गेले होते. क्षणातच त्यांचे घर फोडण्यात आले. चोरीच्या घटना वाढल्या असतानादेखील सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
पोलिसांची बैठक घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांना आळा का घातला जात नाही, असा सवाल सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. कुलूप तोडून घरात घुसून तिजोर्या फोडून चोर्या होत आहेत. पोलिसही हतबल झाले असून आम्हाला सुरक्षा देण्यासाठी कोण वाली आहे की नाही, असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे.
गेल्या वर्षभरात 19 चोरीच्या घटना घडल्या असून लाखो रुपयांच्या मुद्देमालासह सोन्या, चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 32 हून अधिक दुचाकींची चोरी झाली आहे. भररस्त्यात पाच महिलांचे दागिने लांबविण्यात आले आहेत. वृद्धांचे पैसेही लंपास केले आहेत. दुकानांवरील पत्रे कापून चोरीच्या घटना घडल्या आहेत.
राजकारण्यांना केवळ राजकारण दिसते. सामान्य नागरिकांची सुरक्षा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पोलिस केवळ घरोघरी पोलिस ही मोहीम राबवतात. शांतता समितीची बैठक, व्यापार्यांची बैठक घेऊन चोरीच्या घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन करतात.नागरिकांचे मित्र असणार्या पोलिसांनी आता चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी प्रयत्नांची बाजी लावणे गरजेचे आहे.