

बेळगाव : कुद्रेमानी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजय यल्लाप्पा पाटील (वय 42, रा. कुद्रेमानी) यांना शुक्रवारी अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली. रोहयो ग्रुपवर स्वतःचे अश्लील छायाचित्र पाठवल्याने याबाबतची फिर्याद महिलांनी काकती पोलिसांत दिली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुद्रेमानी ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत होणार्या रोजगार हमी योजनेच्या कामासंबंधीची माहिती रोज मिळावी, यासाठी एक व्हॉटस् अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर 13 महिला व तीन पुरुष आहेत. ग्रुपवर ग्राम पंचायत सदस्य पाटीलही आहेत. या ग्रुपवर महिला असल्याचे माहिती असूनही त्यांनी स्वतःचे छायाचित्र या ग्रुपवर पाठवले. महिलांनी त्याला आक्षेप घेत काकती पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना याची सविस्तर माहिती दिली. यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित सदस्यावर भारतीय दंड संहिता 57, आयटी कायदा 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत पाटील यांना अटक केली. त्यांची कारागृहात रवानगी केल्याचे निरीक्षक सुरेश शिंगे यांनी सांगितले.