Nipani Accident| पत्नी आणि चिमुकलीच्या डोळ्यादेखत कारने उडविले; म्हाकवेतील तरूणाचा दुर्दैवी अंत

दुचाकीचे पंक्चर काढण्यासाठी रस्ता ओलांडताना काळाने घातला घाला
Nipani Accident News
Nipani Accident News
Published on: 
Updated on: 

निपाणी : म्हाकवे (ता.कागल) येथून मत्तीवडे (ता.निपाणी) येथे आपल्या पत्नी व मुलीसमवेत दुचाकीवरून जाताना दुचाकी पंक्चर झाल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून पंक्चर काढण्यासाठी पश्चिमेकडून पुर्वेस रस्ता पार करून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कारने उडविले. या भीषण अपघातात म्हाकवे येथील संतोष बंडा शिंदे (वय ४०) हा तरूण जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी (दि.१७) रात्री १० च्या सुमारास झाला. घटनेची नोंद ग्रामीण पोलीसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मृत संतोष शिंदे हा आपल्या दुचाकीवरून पत्नी लता व मुलगी सोनू हिच्यासमवेत मत्तीवडे (ता.निपाणी) नातेवाईकांच्याकडे जात होता. दरम्यान त्याची दुचाकी महामार्गावर कोगनोळी येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर आली असता त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे संतोष याने आपली दुचाकी बाजूला लावून पत्नी व मुलीला तेथे थांबवून तो दुचाकी पंक्चर काढण्यासाठी पश्चिमेकडून पुर्वेस रस्ता पार करून वर्कशॉप शोधण्यासाठी जात होता. दरम्यान याचवेळी बेळगावहून कोल्हापुरकडे जाणाऱ्या भरधाव कारची संतोष याला जोराची धडक बसली. यात संतोष याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, कोगनोळी पोलीस चौकीचे हावलदार जी. एस. कळसापगोळ यांनी धाव घेत मयत दुचाकीस्वाराची ओळख पटवीत कार चालकाला ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी वाहनधारकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रात्री उशिरा कारचालका विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक नाईकवाडी हे करीत आहेत. संतोष याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

पत्नी व मुलीचा एकच आक्रोश

संतोष शिंदे हा आपल्या पत्नी व मुलीसमवेत दुचाकीवरून जात होता. दरम्यान त्याची दुचाकी पंक्चर झाल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून पत्नी व मुलीला तेथे थांबवून तो रस्ता पार करून जात असताना काळ बनून आलेल्या भरधाव कारने त्याला कवेत घेतले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आपल्या डोळयासमोरच पती व वडिलांचा मृत्यू झाल्याने मृत संतोष शिंदे याची पत्नी लता व मुलगी सोनू यांनी एकच आक्रोश करून टाहो फोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.