निपाणी : भीषण आगीत वेल्डिंग दुकानासह फळ दुकान, प्रिंटिंग प्रेस भस्‍मसात ; २० लाखांचे नुकसान

निपाणी : भीषण आगीत वेल्डिंग दुकानासह  फळ दुकान, प्रिंटिंग प्रेस  भस्‍मसात ; २० लाखांचे नुकसान

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : येथील जुना पी. बी. रोडला लागून नगरपालिकेसमोर असलेल्या शिंत्रे कॉलनीत तीन आस्थापनांना मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यात सुमारे २० लाखांची हानी झाली. या आगीत वेल्डिंग, फळ दुकान व प्रिंटिंग प्रेस अशी तीन आस्थापने जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच तत्परता दाखवल्याने मोठे नुकसान व जीवितहानी टळली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगरपालिकेनजिक असलेल्या शिंत्रे कॉलनीत महेश विलास चव्हाण यांच्या मालकीची शालिमार प्रिंटिंग प्रेस, ओमकार रवींद्र भोईटे यांच्या मालकीचे औबीज फ्रुट शॉप तर नवाज गफार कडगी यांच्या मालकीचे कडगी आयर्न अँड स्टील वर्क्स अशी तीन आस्थापने भाडोत्री जागेत एकमेकाला लागून आहेत.

मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानकपणे या  ठिकाणी आग लागली. दरम्यान धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात उठल्याने ही घटना परिसरातील रहिवासी व नागरिकांच्या लक्षात आली. त्यानुसार याची माहिती अग्निशमनसह पोलिसांना दिली. घटनास्थळी निपाणी अग्निशमन दलासह शहर पोलिसांनी धाव घेऊन दोन बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे निरीक्षक ए. आय. रुद्रगौडर यांनी १० कर्मचारी व दोन बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.

या आगीत महेश चव्हाण यांच्या मालकीच्या प्रिंटिंग प्रेसमधील मिनी ऑफसेट प्रिंटिंग, कटिंग मशीन, लाकडी फर्निचर यासह कागद व इतर साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले. लागूनच असलेल्या नवाज कडगी यांच्या वेल्डिंग दुकानातील 4 वेल्डिंग, 2 कटिंग,3 ड्रिल ग्राइंडर मशिन यासह वायरिंग तसेच लोखंडी साहित्य जळाल्याने सुमारे 8 लाख नुकसान झाले. तर जुन्या पी.बी.रोडला लागून असलेल्या भोईटे यांच्या मालकीच्या फळ दुकानाला आग लागल्याने दुकानात असलेली सर्व प्रकारची फळे,फर्निचर व इतर साहित्य जळाल्याने सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले.

घटनास्थळी प्रभारी तहसीलदार प्रवीण कारंडे, उपधीक्षक बसवराज यलीगार, पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, सीपीआय संगमेश शिवयोगी, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर, हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

दहा महिन्यातील दुसरी घटना…

शहरात यापूर्वी 10 फेब्रुवारी 2022 रोजी बस स्थानकाबाहेरील धर्मवीर संभाजी चौक जवळ असलेल्या सदानंद पाटील यांच्या मालकीच्या पद्मा गादी कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात सुमारे 1.25 कोटीचे नुकसान झाले होते.
सीसीटीव्हीचा आधार….

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या आगीत तीनही व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाल्याने तहसील प्रशासन व राज्य सरकारने संबंधितांना  नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news