

निपाणी : शहरात 5 हजारपेक्षा अधिक भटकी कुत्री असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. या कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केली आहे. या कुत्र्यांंचे निर्बिजीकरण करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करूनही पुढील कार्यवाही का केली जात नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने निपाणीकरांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांना चावे घेतले आहेत. त्यात बालक, वृद्ध तसेच महिलांचा समावेश आहे. उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. ही कुत्री घोळक्याने येऊन नागरिकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
शहरातील भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी श्वान निर्बिजीकरण केंद्र कधी उभारणार? याकडे पालिका प्रशासन व सत्तारूढ गटाचे पदाधिकारी लक्ष देणार का, असा सवाल आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. अपघातही वाढले आहेत. कुत्री मागे लागल्याने, अथवा अचानक आडवी आल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. त्यात काहींना अपंगत्वदेखील आलेले आहे. कुत्र्यांमुळे होणार्या या लहान-मोठ्या अपघातांमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. गुरुवारी भटक्या कुत्र्याने 14 जणांचा चावा घेतला. यामध्ये लहान मुलगा व वृद्ध महिला होती. 4 वर्षांच्या बालक यामध्ये जखमी झाले आहे. तरीदेखील पालिका प्रशासन काही हालचाल करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे शहरवासीय वैतागले आहेत. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला या समस्येबाबत काही देणेघेणे दिसत नसल्याने सामान्य जनता चांगलीच कोंडीत सापडली आहे.
बालके शाळेत जात असताना किंवा गल्लीत खेळत असलेल्या बालकांवर भटकी कुत्री हल्ला चढवत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे बालकांना एकटे सोडणे पालकांसाठी अवघड झाले आहे. कुत्र्यांच्या भीतीमुळे मुले अनेकदा शाळेत क्लासला जाणेही टाळत असल्याचे अनेक पालकांनी सांगितले.
शहरात कुत्र्यांनी दिवसादेखील उच्छाद मांडला आहे. बाजारातून जात असलेल्या नागरिकांच्या हातातील पिशव्यांवर ते तुटून पडतात. परिणामी दिवसादेखील रस्त्यावर फिरणे मुश्किल झाले आहे. अर्थसंकल्पात कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लाखोंची तरतूद केली असतानाही कोणतीही कार्यवाही केली जात नाही याचे आश्चर्य वाटते. राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या जीवाशी खेळणे बंद झाले पाहिजे.
अभिनंदन मुदकुडे सामाजिक कार्यकर्ते निपाणी