

Pune Bangalore Highway Accident
निपाणी : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव मालवाहू कंटेनरच्या धडकेत बीड (महाराष्ट्र) येथील एका मजुराचा मृत्यू झाला. मृताची ओळख विजय (पुर्ण नाव समजू शकले नाही) (वय अंदाजे ४ अशी झाली असून त्याच्या वारसांचा शोध निपाणी शहर पोलिसांकडून घेतला जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोईमतूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालक अवनीश राधेश्याम यादव याने वाहन निष्काळजीपणे चालवून महामार्ग ओलांडणाऱ्या विजय याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस तसेच उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून निपाणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
मृत विजय हा गेल्या वर्षभरापासून निपाणी आंबा मार्केटमध्ये मजुरीचे काम करत होता. तो बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची उंची सुमारे ५ फूट २ इंच, मजबूत बांधा, गव्हाळ रंग, लांबट चेहरा असून अपघातावेळी त्याने हिरव्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तो मराठी व हिंदी भाषा बोलत होता.
याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ करत आहेत. मृत व्यक्तीबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास निपाणी शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र. ०८३३८-२२००३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.