

Haryana gang arrested Nipani Police
निपाणी : निपाणी बसस्थानकात गेल्या काही वर्षांपासून गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या हरियाणातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात निपाणी पोलिसांना मोठे यश मिळाले. सोनू थेलू (३१) आणि सतीश सुलता (३७) या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या ५ तासांत अटक केली.
चोरीची घटना १२ मार्च रोजी घडली. कल्पना कळसकर या महिला पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीत त्यांच्या बॅगेतील सुमारे ४० ग्रॅम सोन्याची बोरमाळ चोरीला गेली. एका तरुणाने मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून चोरी केली.
महिलेने आरडाओरडा केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. चिकोडी येथील एका लॉजमध्ये दोघांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी अशाच प्रकारच्या आणखी दोन चोरींची कबुली दिली.
पोलिसांनी हरियाणात जाऊन तपास करत सुमारे १२ लाख रुपये किमतीचे ११ तोळे ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. या टोळीतील आणखी दोन आरोपी फरार आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसरगी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश पवार यांनी एलसीबी पथकाचे हावलदार एम. ए. तेरदाळ, एम. एफ. नदाफ, राजू दिवटे, पी. एम. हिरेमठ, प्रशांत कुदरी, लक्ष्मण कुदरी यांनी दि. १२ मार्च रोजी चिकोडीत जाऊन संशयित चोरट्यांचा तपास केला असता दोघे संशयित एका लॉजमध्ये आढळून आले.
या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी निपाणी पोलिसांचे कौतुक केले आहे. उपनिरीक्षक रमेश पवार आणि त्यांच्या पथकाने यापूर्वीही अनेक गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्या कामगिरीचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी गेल्या वर्षभरात अनेक घटनांचा उलगडा केला आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी एलसीबी पथकाच्या मदतीने उस्मानाबाद, लातूर भागात निपाणी भागातील शेतकऱ्यांना फसवून लांबविलेले १० ट्रॅक्टर आरोपीसह जप्त केले. ही घटना ताजी असतानाच लागलीच प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक पवार यांनी एलसीबी पथकासह पाच दिवस हरियाणा येथे मुक्काम ठोकून या घटनेचा उलगडा केला.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून बक्षीस जाहीर केले आहे.