

निपाणी : सीमाभागातील निपाणी शहरात दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच दुकानदार व व्यापार्यांनीही त्यांच्या नामपाट्यांवर 60 टक्के कन्नड व 40 टक्के मराठी भाषेचा वापर करावा, अशा सूचना गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सुभाष संपगावी होते. तहसीलदार, महसूल, पोलिस, शिक्षण, नगरपालिका विभागाचे अधिकारी तसेच विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रांताधिकारी संपगावी यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या आदेशानुसार सीमाभागात कन्नड भाषेला प्राधान्य देणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये 60 टक्के कन्नड व 40 टक्क मराठी भाषेचा वापर करावा. हे धोरण राबविणे ही सर्व अधिकार्यांची जबाबदारी आहे. सरकारी कार्यालयीन पत्रव्यवहार, लोकांशी संवाद आदी सर्व बाबतीत कन्नड भाषेचा प्रभाव जाणवावा, अशी शासनाची भूमिका आहे. तसेच व्यापार्यांनी आपल्या दुकाने, हॉटेल, कॅफे आदी आस्थापनांच्या पाट्यांवरही कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे.
बैठकीत सर्व विभागप्रमुखांनी शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. विविध खात्यांतील अधिकार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे व शंकांचे निरसन करण्यात आले.
बैठकीला निपाणी पालिका आयुक्त गणपती पाटील, सीपीआय बी. एस. तळवार, ता.पं. कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, चिकोडी जिल्हा शिक्षणाधिकारी सीतारामू, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, महिला व बालकल्याण खात्याच्या सुप्रिया जडगे, कपिल कमते, महादेव बरगाले, रवींद्र शेट्टी, एम. वाय. गोकार, डॉ. एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.
निपाणी व परिसरात बहुतांशी लोक मराठी आहेत. त्यामुळे या नव्या सूचनांमुळे स्थानिक मराठी जनतेत संभ्रम व नाराजीची भावना निर्माण झाली आहे. व्यवहारात आजवर मराठीला जितके महत्त्व होते, त्यात घट होणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.