

निपाणी : शहराबाहेरील हुडको कॉलनी परिसरातील बंद सहा बंगले फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला. एका बंगल्यातील तीन तिजोर्या फोडून चोरट्यांनी 3 तोळे सोन्याचे, 2 किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम 50 हजार असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी जाता-जाता केएलई संस्थेच्या कॉमर्स पदवीपूर्व कॉलेजचा दरवाजा तोडून प्राचार्यांच्या केबीनमध्ये प्रवेश करून साहित्य विस्कटून टाकले. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. त्या आधारे पोलिसांनी तपास चालविला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हुडको कॉलनीतील रहिवासी अक्षय वराळे हे आई-वडिलांसमवेत बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बंगल्यातील तीन तिजोरी फोडून 3 तोळे सोन्याचे, 2 किलो चांदीचे दागिने व रोख 50 हजार लांबविले. वराळे यांचा तीन मजली बंगला असून दुसरा व तिसरा मजला भाडेकरूंना दिला आहे. चोरट्यांनी दुसर्या मजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
या चोरट्यांनी परिसरातील माजी सैनिक राजाराम पाटील यांच्यासह अन्य तीन बंद बंगले फोडले. या ठिकाणी चोरट्यांना ऐवज किंवा रोकड सापडली नाही. त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या केएलई संस्थेच्या कॉमर्स पदवीपूर्व कॉलेज कॅम्पस आवारात प्रवेश करून प्राचार्य केबिनमधील साहित्य विस्कटले. यावेळी त्यांना सुरक्षारक्षकाची चाहूल लागल्याने त्यांनी पोबारा केला. याबाबत सोमवारी बसवेश्वर चौक पोलिसांत अक्षय वराळे यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य रवी पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एलसीबी पथकाच्या साहाय्याने सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली बसवेर चौक पोलिसांचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी तपास चालवला आहे.
चोरट्यांनी वराळे यांच्या घरातून दागिने व रोकड लंपास केल्यानंतर जातेवेळी सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआरही लंपास करून नेल्याने तपासाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनांचा तपास चालला आहे.
निपाणी शहर व उपनगरांत दिवसागणिक घरफोडीचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांत चोरट्यांनी घरफोडीबरोबरच 10 दुचाकी व 5 चारचाकी वाहने लांबवली आहेत. त्यामुळे या घटनेचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान आहे.