

निपाणी : भरधाव ट्रकने पुढे चाललेल्या कारला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, कारमधील एअरबॅग उघडल्याने आतमधील आंध्र प्रदेश येथील दोघे (नाव समजू शकले नाही) सुदैवाने बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी तवंदी घाटातील उतारावर झाला. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आंध्र प्रदेश येथील दोघेजण कारमधून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांची कार तवंदी घाटाच्या उतारावर आली असता, केरळहून शहाळी भरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी ट्रकने कारला मागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे कार पलटी होऊन चक्काचूर झाली व तिचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग्स उघडल्याने दोन्ही प्रवासी गंभीर दुखापतीपासून बालबाल बचावले. अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.