

बेळगाव : दुचाकीचा अपघात झाल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्या नऊ जणांना तिसर्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि 70 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
बसप्पा कोप्पद, फकीराप्पा हनुमंतप्पा तेणगी, ज्ञानेश्वर बसवंत तेणगी, मुरारी रामचंद्र तेणगी, बसवंत हनुमंत तेणगी, रेवण्णा शिवप्पा दंडय्याप्पागोळ, लकव्वा सोमनिंग मुद्देण्णावर, यल्लवा फकीरप्पा तेणगी व शिवप्पा हनुमंतप्पा दंडय्याप्पागोळ (सर्व रा. बुद्दीगोप्प ता. सौंदत्ती) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आरोपी बसप्पा कोप्पद 10 मार्च 2017 रोजी दुचाकीवरुन बुद्दीगोप्पहून यरजरवीकडे निघाला होता. यावेळी समोरुन फिर्यादी सिद्धाप्पा सोमाप्पा आळदकट्टी (रा. बुद्दीगोप्प, ता. सौंदत्ती) दुचाकीवरुन येत होते. यावेळी दोन्ही दुचाकींची धडक झाली. यावरुन दोघांत किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर 20 एप्रिल 2017 रोजी आरोपीने फिर्यादीबरोबर भांडण काढून त्याला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केली.
याप्रकरणी मुरगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करुन तिसर्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षी आणि पुरावे तपासण्यात आले. यामध्ये वरील सर्वजण दोषी आढळल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून आर. जी. देवरेड्डी यांनी काम पाहिले आहे