

बेळगाव : चोरीचा आरोप करत एकाला दोघांनी मारहाण केली. त्याच्याकडे 500 रुपयांची मागणी करताना केसाला धरून डोके जमिनीवर आपटले. शिवाय छाती, पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बहुदा अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा दुसर्या दिवशी मृत्यू झाला. येळ्ळूर येथे घडलेल्या या घटनेनंतर दोघांवर वडगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत एफआयआर प्रक्रिया सुरू होती.
हुसेन गौससाब ताशेवाले (वय 38, रा. प्रताप गल्ली, येळ्ळूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज चांगाप्पा इंगळे (39) व मिथून महादेव कुगजी (38, दोघेही रा. येळ्ळूर) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, हुसेन याच्यावर ते दोघे चोरीचा आरोप करत होते. यातूनच शनिवारी दुपारी त्याला रस्त्यात अडवत मनोज व मिथून या दोघांनी मारहाण केली. तू चोरी केली आहेस. त्यामुळे आता आम्हाला पाचशे रुपये दे, असे म्हणत त्याच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारताना केस धरून डोके जमिनीवर आपटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर काही तासांनी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी यांनी सायंकाळी मृताच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात दोघे संशयित असून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याने या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत एफआयआरची प्रक्रिया सुरू होती.
हुसेनला शनिवारी दुपारी मारहाण झाली. त्यानंतर तो उठून घरी गेला. रात्री जेवण करून झोपी गेला. परंतु, सकाळी जेव्हा त्याची आई त्याला उठवण्यास गेली तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. यानंतर याची माहिती वडगाव पोलिसांना दिली. मारहाणीवेळी त्याला काही जाणवले नाही. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव होऊन नंतर त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे.