

बेळगाव : महापालिका सभागृहात ठराव करुनही नगरसेवकांना एखाद्या विषयाची माहिती मिळत नाही, जुन्या अधिकार्यांना विचारण्यात यावे, असे सांगण्यात येत असेल तर ठरावाला काय किंमत राहते? जर माहिती द्यायची नसेल तर आम्हाला काहीही विचारू नका असे सांगण्यात यावे, अशा शब्दात नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त केला.
महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी (दि. 2) महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमआयएमचे नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी नगररचना अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. मी एका माहितीसाठी दोनवेळा पत्र दिले आहे. महापालिकेच्या सभागृहात कोणतीही माहिती विचारल्यानंतर दहा दिवसांच्या आत ती देण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे.
असे असतानाही नगररचना विभागाकडून माहिती देण्यात येत नाही. आजच्या सभेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता अर्धवट माहिती व्हॉटस अॅपवर पाठविण्यात येते. या प्रकाराला जबाबदार कोण? सभागृहात ठराव केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करता येत नसेल तर संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी; अन्यथा आम्ही माहिती विचारत असल्याचा त्रास होत असेल तर तसे आम्हाला सांगावे, असे त्यांनी सुनावले.
एखाद्या कामाबद्दल अधिकार्यांना विचारले तर ते जुन्या अधिकार्याने केले आहे. त्याला विचारा, असे सांगण्यात येते. अधिकार्यांची बदली झाली तर आम्ही त्यांची घरे शोधत कामाबद्दल विचारत बसू काय, असा सवाल अजिम पटवेगार यांनी केला. नगररचना अधिकारी वाहिद अख्तर यांनी नगरसेवकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
संबंधित नगरसेवकांनी माहिती विचारली होती, त्यावेळी कर्मचारी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणात होते. त्यामुळे, माहिती देण्यास वेळ झाला, अशी सारवासारव केली. तर आयुक्त कार्तिक एम. यांनी यापुढे नगरसेवकांना वेळेवर माहिती देण्यासाठी अधिकार्यांना सूचना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
एका सभेवर आठ लाखांचा खर्च
महापालिकेत सर्वसाधारण सभा घेण्यासाठी आठ लाख रुपयांचा खर्च करण्यात येतो. इतका मोठा खर्च करुन आणि दिवसभर चर्चा करुन नगरसेवकांना वेळेवर माहिती मिळत नाही. माहिती मिळत नसल्यामुळे सभागृहात चर्चा करता येत नाही. हा सारा खटाटोप कशाला करायचा, मनमानी करणार्या अधिकार्यांवर कोण कारवाई करणार, असा सवाल नगरसेवक पठाण यांनी केला.