

बेळगाव : देशामध्ये भाजपने दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी यांच्याविरोधात कटकारस्थान रचले आहे. या समाजातील एखादी व्यक्ती उच्च पदावर विराजमान झाली तर त्यांच्याविरोधात आरोप करणे असे प्रकार सुरू आहेत. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून अशा व्यक्तींना संरक्षण द्यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी (दि. 10) जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भाजप, आरएसएस सामाजिक सौहार्दता बिघडवत आहे. जाती आणि समुदायांमध्ये द्वेष पसरवत आहे. त्यांना दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी आणि भटक्या समुदायांची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक प्रगती सहन होत नाही. यातूनच मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांक खर्गे यांच्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
प्रियांक खर्गे यांचा अवमान करण्यात आला आहे. अवमान केलेल्यांच्या विरोधात लवकरच अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यापुढे कोणत्याही दलित नेत्याचा अवमान झाला तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, श्रीकांत तळवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.