

कारवार : दुचाकी ओव्हटेक केल्याच्या वादातून एकावर चाकूहल्ला करुन जखमी केल्याची घटना होन्नावर तालुक्यातील गेरेसप्पा रस्त्यावर माविनहोल्यानजीक नुकतीच घडली. विवेक सुरेश नायक (वय 26, रा. कुद्रगी, ता. होन्नावर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अदनान नदीम शेख (वय 26, रा. होन्नावर) याला अटक केली आहे.
अंकोल्याजवळ बस-लॉरी अपघातात दोघे ठार
समोरासमोर धडक : बसमधील आठ प्रवाशीही जखमी
कारवार : बस व लॉरीची समोरासमोर धडक होऊन लॉरी चालकासह बसप्रवासी ठार झाला. तर आठजण जखमी झाले. अंकोला तालुक्यातील कंचिनबागिलाजवळ नुकताच हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, लॉरी अंकोल्याकडून यल्लापूरच्या दिशेने जात होती. कंचिनबागिलाजवळ नियंत्रण सुटलेल्या भरधाव लॉरीने समोरुन येणार्या परिवहन महामंडळाच्या बसला धडक दिली. त्यात लॉरीचालकासह बसमधील प्रवासी भास्कर गावकर (रा. केणी, ता. अंकोला) यांचा मृत्यू झाला आहे.
बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असून त्यांना अंकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहीजण गंभीर जखमी असून त्यांना मंगळूर रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अंकोला पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.