

बेळगाव : आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून स्वतःही उडी घेत महिलेने जीवन संपविलेची घटना मंगळवारी (दि. 12) रात्री रामदुर्ग तालुक्यातील सिदनाळ गावात घडली. लक्ष्मी मल्लिकार्जुन गौडवगोळ (वय 24), मुलगी हालव्वा (वय 3) व मुलगा हालप्पा (वय 1, सर्वजण रा. बेंचिनमर्डी, ता. गोकाक) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, लक्ष्मीचा पती मल्लिकार्जुन हा मेंढपाळ आहे. विविध ठिकाणी कुटुंबासमवेत जाऊन ते हा व्यवसाय करतात. त्यानुसार हे कुटुंब सिदनाळमध्ये बकरी घेऊन गेले होते. परंतु, तब्येत ठिक नसल्याने लक्ष्मी मूळ गावी परतली होती. त्यानंतर पतीच्या सुचनेनुसार ती पुन्हा सिदनाळला गेली होती.
मंगळवारी रात्री तिने आधी दोन्ही मुलांना विहिरीत फेकले व त्यानंतर स्वतःही उडी घेत जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच कटकोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक बडिगेर, उपनिरीक्षक बसवराज कोन्नूर यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
त्यानंतर विहिरीतून मृतदेह काढण्यात आले. मुलगा हालप्पाचा मृतदेह उशिराने सापडला. लक्ष्मीने हे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण समजू शकले नाही. कटकोळ पोलिस पुढील तपास करत आहेत.