

कागवाड; पुढारी वृत्तसेवा : कागवाड मतदारसंघातील कुसनाळ आणि मोळवाड गावांना कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी भेट देऊन पाणी पातळीची पाहणी केली. कुसनाळ ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
संभाव्य पूरस्थितीमुळे निवारा केंद्रात नेण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्याची विनंती गावातील नेत्यांनी आ. पाटील यांच्याकडे केली. त्याची दखल घेत आमदारांनी जिल्हाधिकार्यांशी दूरध्वनीवरून संर्पक साधून कुसनाळ गावासाठी लवकरच बोटीची व्यवस्था करण्याची सूचना केली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व सुविधांसह निवारा केंद्रांची सोय करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. आ. पाटील यांनी पावसातच स्थानिकांसह बोटीने जाऊन कृष्णा नदीच्या पूरस्थितीची पाहणी केली.
आमदार श्रीमंत पाटील यांनी मोळवाड येथील ग्रामस्थांचीही भेट घेऊन ग्रामस्थांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.