

बेळगाव : एका अल्पवयीन युवतीवर दोघा अल्पवयीन युवकांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिसर्या युवकानेही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्यानंतर तिने ही माहिती घरच्या लोकांना दिली. ही घटना देसूर परिसरातील एका धाब्यावर घडली असून, त्याबद्दल राजहंसगडच्या दोन युवकांचा शोध सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ही तक्रार नोंदवण्यासाठीही पीडित युवतीच्या कुटुंबीयांना वडगाव आणि टिळकवाडी अशी दोन ठाणी फिरावी लागली.
शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणार्या 17 वर्षीय युवतीला तिच्या कॉलेजमध्ये शिकणार्या तिघाजणांनी बाहेर फिरायला जाऊया, असे सांगत नेले. हे चौघेही बेळगाव-खानापूर मार्गावर देसूरजवळच्या एका धाब्यावर गेले. तेथे एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. दुसर्यानेही तिला भीती दाखवून अत्याचार केला.
तिसर्या एका तरुणानेही तिला धमकी देत अत्याचाराचा प्रयत्न केल्यानतर तिने मोबाईलवरून ही घटना घरच्या लोकांना सांगितली. त्यानुसार या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर युवतीची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तिघे संशयित फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांचा बेजबाबदारपणा
घटना कुठेही घडलेली असली तरी तक्रारदाराकडून तक्रार नोंदवून घ्या आणि नंतर ती संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करा, असा कायदा आहे. तरीही या पीडित मुलीची तक्रार वडगाव पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. तिला टिळकवाडी परिसरातील कॉलेजमधून नेण्यात आले होते, त्यामुळे तक्रार टिळकवाडी ठाण्यात करा, असे सांगत त्यांना टिळकवाडीला पाठवण्यात आले. अत्याचारासारखी गंभीर घटना असूनही वडगाव पोलिसांनी तक्रार का नोंदवली नाही, असा प्रश्न पीडितेच्या कुटुंबीयांचा आहे. त्याकडे पोलिस आयुक्त लक्ष देणार का, हा प्रश्न आहे.