

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव तालुक्यात सहकारी तत्त्वावरील एकमेव साखर कारखाना असलेल्या काकतीतील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने सभासदांना नोटीसा धाडल्या आहेत.
तालुक्यातील शेतकर्यांनी काकतीत मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेल्या तीन वर्षापासून या कारखान्यात गाळप सुरु झाले असून शेतकर्यांतून चांगला प्रतिसाद लाभत आहे. अविनाश पोतदार आणि तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याची वाटचाल सुरु आहे. आता कारखाना प्रशासनाने सभासदांना पाठवलेल्या नोटीसीनुसार 27 ऑगस्ट रोजी कारखान्याच्या संचालकपदासाठी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या नोटीसीत निवडणुकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षापासून विद्यमान संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावली असून अध्यक्ष पोतदार यांनी कारखान्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तर उपाध्यक्ष पाटील यांनी कारखान्याच्या गाळपासाठी चांगल्या पद्धतीने आर्थिक भार उचलला आहे. याशिवाय अनेक संचालकांनी कारखान्यासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे, यंदा कारखान्यासाठी निवडणूक होणार की संचालकांची बिनविरोध निवड होणार याबाबत सभासदात उत्सुकता लागून आहे.
शेतकर्यांच्या पुढाकाराने सहकारी तत्त्वावर सुरु असलेल्या या कारखान्यात निवडणूक न होता संचालकांची बिनविरोध निवड व्हावी, अशी अपेक्षा शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास खर्चही वाचेल तसेच अनावश्यक राजकीय चुरस निर्माण होणार नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.