

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शहीद भगतसिंग चौकात उभारलेला मराठी फलक शुक्रवारी हटविण्यात आला होता. मराठी स्वागत फलक हटविण्याच्या महापालिकेच्या कृतीविरोधात मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने जोरदार आवाज उठवताच शनिवारी (दि. 26) पुन्हा त्या जागेत फलक पूर्ववत उभारण्यात आला.
गणेशोत्सव जवळ येत असल्याने सार्वजनिक मंडळांकडून आगमन सोहळ्याची तयारी सुरू आहे; मात्र ठिकठिकाणी उभारण्यात आलेले मराठी फलक महापालिकेला खुपू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे शहरातील पाटील गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूजा केल्यानंतर शहीद भगतसिंग चौकात भव्य फलक उभारला होता. या फलकावर कन्नड अक्षरे नसल्याचा कांगावा करून महापालिकेकडून शुक्रवारी तो फलक हटविण्यात आला होता. या कृत्यानंतर मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता.
कानडीकरणाचा ध्यास घेतलेल्या महापालिकेने बाप्पाच्या स्वागताचा फलक हटविल्यानंतर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने तीव्र निषेध व्यक्त केला होता. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी सकाळी शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी भेट घेऊन शहरातील गणेशोत्सवाची देदीप्यमान परंपरा सांगून भाषिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन केले. यानंतर बोरसे यांनी मनपा आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून चर्चा केल्यानंतर ‘त्या’ फलकाचे विघ्न दूर झाले.
महापालिका प्रशासनाने नमते घेत पाटील गल्ली येथील हटविण्यात आलेला मराठी फलक पूर्ववत बसवण्यास अनुमती दिली. पाटील गल्ली गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाच्या स्वागताचा फलक पूर्ववत जागी उभारला. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आदींसह पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.