

बेळगाव : प्रेमविवाह करूनही घटस्फोट घेतलेल्या पोलिस कॉन्स्टेबल पतीने पूर्वाश्रमीच्या पत्नीचा भोसकून खून केला आहे. अकरा वर्षांच्या मुलाचा ताबा देण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर या कॉन्स्टेबलने पत्नीच्या कार्यस्थळी जाऊन तिचा खून केला, तसेच घराला कुलूप लावून ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. त्याला अटक झाली आहे.
पाच दिवसांपूर्वी सौंदत्ती तालुक्यातील रामापूर साईट येथे घडलेल्या खुनाची सौंदत्ती पोलिसांत नोंद झाली असून, पोलिस कॉन्स्टेबल पतीला अटक झाली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याचा बारा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता.
काशव्वा संतोष करीकट्टी (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. कॉन्स्टेबल संतोष कांबळे (वय 36) असे खून करणार्या पोलिसाचे नाव आहे. काशव्वा राज्य परिवहन विभागाच्या सेवेत कंडक्टर म्हणून काम करत होती. काशव्वाने संतोषच्या सततच्या संशयामुळे घटस्फोट घेतला होता. गेल्या एप्रिलमध्येच घटस्फोट झाला होता. परंतु, अकरा वर्षांचा मुलगा माझ्या ताब्यात हवा असे म्हणत संतोष काशव्वाशी सातत्याने भांडण काढत होता.
पोलिस कॉन्स्टेबल संतोष कांबळे व काशव्वा करीकट्टी यांची बारा वर्षांपूर्वी एकमेकांशी ओळख होऊन प्रेमविवाह झाला. त्यांचा मुलगा सध्या अकरा वर्षांचा आहे. काशव्वा या एसटी महामंडळात कंडक्टर होत्या, तर संतोष हा निपाणी येथील ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. घटस्फोट झाल्यानंतरही गेल्या काही महिन्यांपासून दोघांची सातत्याने भांडण सुरू होती. त्यामुळे काशव्वाने आपली बदली सौंदत्ती डेपोमध्ये करून घेतली होती.
गेल्या सोमवारी संतोषने पुन्हा रामापूरला जाऊन मुलाचा ताबा मागत भांडण काढले. वाद वाढत जाऊन त्याने काशव्वा यांना चाकूने भोसकले व घराला कुलूप लावून तो फरारी झाला.
काशव्वा कामावर न आल्याने तिच्या सहकार्याने घरी जाऊन चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सौंदत्ती ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी तपास करून दोन दिवसांपूर्वी संतोषला अटक केली.
न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानंतर संतोष आपल्या अकरा वर्षांच्या मुलाचा ताबा मागत होता. यासंबंधी पंचमंडळींच्या समक्ष मुलाकडे विचारणा केली असता, त्याने आईकडे राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याला काशव्वाच्या ताब्यात देण्यात आले होते. यामुळे संतोषला राग होता. काशव्वा राहात असलेल्या रामापूर साईट येथे जाऊन पुन्हा भांडण काढत होता.