

बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या कामाला कंत्राटदाराने शुक्रवारपासून (दि. 10) प्रारंभ केला. धामणे रस्त्याला लागून काम सुरु करण्यात आले. या रस्त्यावर काही ठिकाणी चर मारण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला सक्त ताकीद देऊन माघारी धाडले आहे. तरीदेखील काम सुरुच होते.
हलगा-मच्छे बायपासमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामधील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. तरी देखील हा रस्ता दडपशाही करत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शुक्रवारी कंत्राटदार यंत्रसामुग्रीसह रस्ता करण्यासाठी दाखल झाला. न्यायालयात धाव घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ते काम बंद पाडले. न्यायालयाने आम्हाला स्थगिती दिली असल्याने काम बंद करा, असे शेतकऱ्यांनी सुनावले. मात्र, जे शेतकरी न्यायालयात गेले नाहीत, त्यांच्या जमिनीमध्ये सपाटीकरणाचे काम कंत्राटदाराने सुरुच ठेवले आहे.
हलगा येथील शेतकरी सुरेश मऱ्याकाचे यांनी त्यांना जोरदार विरोध केला. यावेळी कंत्राटदार त्याच्याकडे शेतकऱ्याकडे न्यायालयाचा आदेश मागत होता. सध्या आपल्याकडे कागदपत्रे नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ही कंत्राटदाराला तुम्ही कोणत्या आधारे या रस्त्याचे काम करत आहात. त्याची कागदपत्रे द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे, कंत्राटदाराने तेथून काढता पाय घेतला. मात्र इतर शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सपाटीकरणाचे काम सुरू ठेवले होते. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.