बेळगाव ः गेल्या काही दिवसांपासून ऐन ऑक्टोबरमध्ये शहरासह जिल्ह्यात पावसाचा मारा सुरू असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण 123.67 मिमी पाऊस झाला असून सरासरी 22.39 मिमी आहे. सर्वाधिक एकूण 250.1 मिमी पाऊस अथणी तालुक्यात तर सर्वात कमी 46 मिमी पाऊस कागवाड तालुक्यात नोंदविण्यात आला. मुडलगी तालुक्यातील यादवाडमध्ये सर्वाधिक 73.4 मिमी पावसाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरु आहे. बेळगाव जिल्ह्यातही काही भागात मुसळधार तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. अचानक ढग दाटून येत असून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात कमी पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात या अवकाळी पावसाचा जोर अधिक आहे. त्या तुलनेत सर्वाधिक पावसासाठी ओळखल्या जाणार्या खानापूर व बेळगाव तालुक्यात या पावसाचा जोर कमी आहे.
अथणीपाठोपाठ बेळगाव 184.2, मुडलगी 167.6, रामदुर्ग 162.4, गोकाक 145.5, खानापूर 135.8, सौंदत्ती 124.6 मिमी असा एकूण पाऊस झाला आहे. सरासरीचा विचार केल्यास गोकाकमध्ये सर्वाधिक 36.38 मिमी तर सर्वात कमी 9.6 मिमी पाऊस हुक्केरी तालुक्यात झाला आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातील सरासरी अनुक्रमे 18.42 व 15.08 मिमी आहे. मुडलगी तालुक्यातील यादवाडमध्ये सर्वाधिक 73.4 मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर चिकनंदी (गोकाक) 54.2, तेलसंग (अथणी) 46.3, यरगट्टी (सौंदत्ती) 46, कटकोळ (रामदुर्ग) 45, एमके हुबळी (कित्तूर) 39.2, सुळेभावी (बेळगाव) व शेडबाळ (कागवाड) 33.2, कणकुंबी (खानापूर) 28.6, बेळवडी (बैलहोंगल) 27.8, यलपारट्टी (रायबाग) 23, गळतगा (निपाणी) 17, हुक्केरी (हुक्केरी) 15.6, जोडट्टी (चिकोडी) 12.6 मिमी पाऊस झाला आहे.