

बंगळूर : केपीएससीअंतर्गत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्यात सहभागी असलेल्या भाजप नेते बसवराज कन्नाळे यांचे कारनामे पाहून सीआयडीचे तपास अधिकारी थक्क झाले आहेत.
कन्नाळे फक्त सहा वर्षांपूर्वी २० हजार रुपये मासिक पगारावर लिपिक म्हणून काम करत होता. त्याच्या मालकीचे दुबईत एक पंचतारांकित हॉटेल आहे आणि त्याने विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. २०२० मधील कोविड महामारीच्या काळात, कन्नाळेने राजनकुंटे भागातील सिंगनायकनहळ्ळी जवळील केळीच्या घाऊक बाजारात एका नातेवाईकासोबत रायटर म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याचा पगार सुमारे २०,००० रुपये होता. मात्र, महामारी ओसरल्यानंतर त्याची एका प्रभावशाली भाजप नेत्याशी मैत्री झाली आणि त्याने या संबंधांचा वापर करून घोटाळा केला.
आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र गंगवार यांची केपीएससीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर कन्नाळेच्या संपूर्ण जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला. दोन वर्षांच्या कालावधीत, कन्नाळेने ज्ञानेंद्र यांच्या मदतीने केपीएससीमधील विविध पदांवर विशिष्ट उमेदवारांच्या नियुक्त्या घडवून आणल्या. प्रोबेशनरी डीवायएसपींसोबतचे त्याचे फोटो या आरोपांना दुजोरा देतात. या बेकायदेशीर भरती रॅकेटमधून मिळालेली रक्कम त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवली, एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केली आणि सावकारीचा व्यवसायही केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने दुबईत एक व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याची तयारीही केली होती. प्रत्येक भरती प्रक्रियेत आपल्याच उमेदवारांना नोकरी मिळेल याची त्याने खात्री केली आणि त्या बदल्यात कोट्यवधी रुपये कमावले. त्याने ही रक्कम दुबईतील हॉटेलसह विविध व्यवसायांमध्ये गुंतवल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.