

बेळगाव : 2025-26 आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत नैऋत्य रेल्वेच्या मालवाहतूक आणि एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 2.22 दशलक्ष टन अधिक मालवाहतून झाल्याची माहिती नैऋत्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे दिली आहे. साहजिकच यंदा रेल्वेच्या उत्पन्नात आपसूकच वाढ झाली असून मालवाहतूकीतून 1,064 कोटी रुपये कमाई झाली आहे.
एप्रिल ते जुलै 2025 पर्यंत एकूण मालवाहतूक 16.27 दशलक्ष टन झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 14.05 दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती. यंदा 2.22 दशलक्ष टन मालवाहतूक जादा झाली आहे. मालवाहतुकीत लोह खनिज वाहतूक 6.41 दशलक्ष टन झाली असून गतवर्षी ती 5.54 दशलक्ष टन झाले होते. स्टील वाहतूक यंदा 3.54 दशलक्ष टनांपर्यंत झाली असून गेल्यावर्षी ती 2.49 टन होती. स्टील प्रकल्पांसाठीच्या कच्चा मालाच्या वाहतुकीत सर्वाधिक वाढ झाली आहे. गतवर्षी ती 0.47 दशलक्ष टन होती. यंदा ती 0.71 दशलक्ष टनांवर पोचली आहे. खत वाहतूक 4.2 दशलक्ष टन झाली आहे.
कोळशाची वाहतूक 3.32 दशलक्ष टन झाली असून गेल्यावर्षी 2.93 दशलक्ष टन झाली होती. त्याशिवाय इतर मालवाहतूकही झाली असून रेल्वेच्या उत्पन्नात आपसूकच वाढ झाली आहे. मालवाहतूकीतून 1,064 कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीत नैऋत्य रेल्वेने एकूण 2,972 कोटी उत्पन्न मिळवले आहे. गतवर्षी 2024 मध्ये याच कालावधीत 2,634 कोटी महसूल मिळाला होता.