

KLE is an excellent educational institution
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
केएलई संस्था विविध क्षेत्रातील एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जात आहे. कृषी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता लक्षात घेऊन सरकारने केएलई संस्थेला उत्तर कर्नाटकातील पहिले कृषी महाविद्यालय मंजूर केले आहे, अशी माहिती कृषी मंत्री एन. चलुवरायस्वामी यांनी दिली.
यरगट्टीतील तेनिकोळद केएलई कृषी विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. १९) कृषी शिक्षण प्रणालीवरील कृषी विकास संवाद कार्यक्रम झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्याहस्ते माजी आमदार महांतेश कवटगीमठ अध्यक्षस्थानी होते. केएलईचे अध्यक्ष आमदार महांतेश कौजलगी, बी. आर. पाटील, संचालक डॉ. व्ही. आय. पाटील, जयानंद मुनवळ्ळी, डॉ. ए. बी. पाटील व्यासपीठावर होते.
ते पुढे म्हणाले, महाविद्यालयाच्या इमारतीतील सर्व विभागांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि व्याख्यान कक्ष उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांनी बांधले गेले आहेत. विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण मिळणे. व्यावहारिक शिक्षण साकारणे खूप उपयुक्त आहे. याबद्दल केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे, असे त्यांनी सांगितले.
कवटगीमठ म्हणाले की, अनेक वर्षांपासून कृषी महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होतो. केएलईच्या उच्च सेवेचा विचार करुन महाविद्यालय सुरू करण्यासाठी कृषी मंत्री चलुवरायस्वामी यांनी महत्वाची भूमिका बजावली. याठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी शिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आमदारकौजलगी यांनीही विचार मांडले.
यावेळी जिल्ह्याचे कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मंजुनाथ चौरडी, शिवानंद गौडा, डॉ. एस. एस. हिरेमठ, एस. एम. वरद, जी. बी. विश्वनाथ, डॉ. भावनी पाटील, डॉ. गुरुराज कौजलगी, शंकर गौडा पाटील उपस्थित होते. डॉ. पृथ्वी हेगडे स्वागत केले. डॉ. बाळेश यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सौरभ मुनवळ्ळी यांनी आभार मानले.