

बेळगाव : जुन्या वादातून आश्रय कॉलनी, बाहेर गल्ली, खानापूरमधील एकाचा खून केल्याप्रकरणी येथील चौथ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने बापलेकाला जन्मठेप व 40 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. संध्या एस. यांनी शुक्रवारी (दि. 26) हा निकाल दिला. प्रशांत दत्तात्रय नार्वेकर व दत्तात्रय काशिनाथ नार्वेकर (दोघेही रा. बाहेर गल्ली, खानापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, फिर्यादी मेघा मारुती ऊर्फ कृष्णा जाधव हिच्याकडे आरोपी प्रशांत वाईट नजरेने बघत होता. याबाबत मेघा आणि तिचा पती मारुती यांनी अनेकवेळा त्याला सांगितले होते. मात्र, आरोपी आणि त्याचे वडील या दाम्पत्यांशी नेहमीच वाद घालत होते. 30 ऑक्टोबर 2022 रोजी मारुती ऊर्फ कृष्णा गणूराव जाधव हे फिरण्यासाठी जात असताना आरोपी प्रशांत आणि दत्तात्रयने त्यांना अडवून धारदार शस्त्रांनी वार केला. त्यात मारुती यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खानापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे व मंजुनाथ नायक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल.ा त्यानंतर मयत मारुती यांची पत्नी मेघा यांनी उपरोक्त दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर भादंवि 341, 302, 201, 506 सह कलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून चौथ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याची सुनावणी सुरू असताना साक्षीदार असलेल्या शुभांगी कवळेकर आणि दत्तात्रय कवळेकर यांना नार्वेकर बापलेकांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. न्यायालयात साक्षी, कागदोपत्री पुरावे, मुद्देमाल तपासण्यात आले. त्यात दोघेही दोषी आढळले. यामुळे न्या. संध्या यांनी दोघांनी जन्मठेप व 40 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.