

खानापूर : खानापूर-जांबोटी राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असले तरी ते अतिशय संथगतीने होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे, जांबोटी भागातील लोक मच्छे-पिरनवाडीमार्गे वळसा घालून खानापूरचा प्रवास करत आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावून खानापूर-जांबोटी मार्गावरील प्रवास खड्डेमुक्त करावा अशी मागणी होत आहे.
जांबोटी ते चोर्ला या रस्त्याचा विकास झाल्याने गोव्याला जाणारे प्रवासी चोर्ला मार्गाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. तथापि या रस्त्यापैकी खानापूर ते जांबोटी या रस्त्याची जागोजागी अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्यात तर प्रवाशांचे हाल नको होणार आहेत. हा 18 किलोमीटर अंतराचा मार्ग असला तरी काही ठिकाणी सुस्थितीत आहे. रस्ता खराब झालेल्या ठिकाणी सीआरएफ फंडातून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आठ दिवसांपासून कंत्राटदाराने खडी व मशीन आणून काम सुरु केले आहे. तथापि हे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने पावसाळ्यापूर्वी मार्गी लागेल की नाही, अशी भीती प्रवाशांना लागून आहे.
कान्सुली क्रॉस, निलावडे क्रॉस, शंकरपेठ चढती, ओलमनी, दारोळी क्रॉस या ठिकाणी डांबर गायब झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी असल्याने सावलीमुळे खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण झाले आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे त्यात वेडीवाकडी वळणे असल्याने खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्ता दुरुस्तीचे काम ठप्प झाल्याने लग्नसराईच्या हंगामात प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केंद्रीय राखीव निधीतून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्डे भरण्यासाठी चांगल्या खडीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
बहुतांश ठिकाणी बाजूपट्टी गायब झाली असल्याने रस्त्याकडेला धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजूपट्टीच्या अभावामुळे दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. डांबरीकरणाबरोबरच बाजूपट्टीचाही विकास करण्यात यावा, अशी मागणी आहे.