

खानापूर : खानापूर-जांबोटी रस्त्याच्या विकासकामाला सुरुवात झाली आहे. सहा कोटी रुपये अनुदानातून सुमारे 15 किमी लांबीच्या या रस्त्याचे सद्य रुंदीत डांबरीकरण करण्याची ही योजना आहे. पुढील दीड महिन्यात डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
खानापूर शहराजवळील शुभम गार्डनपासून जांबोटी वन कार्यालयाजवळील मारुती मंदिरापर्यंतच्या 15 किमी अंतर लांबीच्या रस्त्याचा विकास केला जात आहे. शुभम गार्डन ते मोदेकोप क्रॉसपर्यंत रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे, तिथून पुढे जांबोटीपर्यंत रस्त्याची रुंदी पावणेचार मीटर आहे. ही रुंदी आहे तेवढीच ठेवण्यात येणार आहे. शंकरपेट पुलाजवळ गोलाकार वळणामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला 300 मीटर अंतरापर्यंत साडेपाच मीटर रुंदीचा रस्ता आहे. या ठिकाणी साडेपाच मीटर इतके डांबरीकरण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या विकासासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला होता. दोन वर्षानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे.
बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील परराज्याला जोडणार्या रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्यानुसार खानापूर जांबोटी रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. कान्सुली, निलावडे क्रॉस, ओलमणी, दारोळी जवळ खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे वाहने नादुरुस्त होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारी बुजल्याने पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे, रस्ता खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बाजूपट्ट्यांवर मातीचा भराव टाकून त्यानंतर खडीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. जांबोटी-चोर्ला महामार्गाचा विकास करुन तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर खानापूर-जांबोटी हा रस्ताही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त भारामुळे रस्त्याची वाताहत
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गतवर्षी कारवार जिल्हाधिकार्यांनी रामनगरमार्गे सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. त्यावेळी खानापूर-जांबोटी रस्त्यावर अतिरिक्त भार पडला होता. अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची धूळधाण उडाली होती. परिणामी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जांबोटी भागातील लोकांनी केली होती. खड्ड्यांच्या दुरुस्तीसह संपूर्ण 15 किलोमीटर अंतर रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.