

खानापूर : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी सहपरिवार गावाकडे येण्यासाठी निघालेल्या पुण्यातील खानापूरकर आणि बेळगावकर चाकरमान्यांची अपुऱ्या बसेसमुळे त्रेधा उडाली आहे. शुक्रवारी (दि. ६) सकाळपासून स्वारगेट बस स्थानक परिसरात हजारो प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबले आहेत. संध्याकाळपर्यंत या गर्दीत आणखी वाढ होणार असल्याने त्यांना वेळेत गावाकडे पोहोचण्याची चिंता लागून राहिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी गृहीत धरून कर्नाटक व महाराष्ट्र परिवहनकडून अतिरिक्त बसेस सोडल्या जातात. पण तुफान गर्दीमुळे हा पर्याय तोकडा पडत आहे. पुणे, बेळगाव मार्गावर बेळगाव आगारातून जादाच्या बारा बस सोडण्यात आल्या आहेत. तथापि या बस पुण्यातून शुक्रवारी सायंकाळी व रात्री निघणार आहेत. लहान मुले सोबत असल्याने दिवसाचा प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी सध्या स्वारगेट स्थानकावर कर्नाटक परिवहनची एकही बस नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे.
खानापूर, हल्याळ, बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागातील हजारो प्रवासी सकाळपासून बसच्या प्रतीक्षेत आहेत. स्वारगेट बस स्थानक परिसरात तुफान गर्दी झाल्याने मोबाईल नेटवर्कवरदेखील परिणाम झाला आहे. गर्दीचा ताण पडल्याने मोबाईलची रेंज उपलब्ध होणे देखील कठीण झाल्याचे तेथे अडकून पडलेल्या प्रवाशांनी सांगितले. खासगी प्रवासी वाहने आधीच बुक झाल्याने बसने विना आरक्षण प्रवास करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.