

चिकोडी, पुढारी वृत्तसेवा : नद्यांना होणारा पाण्याचा विसर्ग, पावसाचे प्रमाण, धरणांतील पाण्याची पातळी व महाराष्ट्र राज्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर लक्ष ठेवून सतत महाराष्ट्रातील अधिकार्यांशी संपर्कात राहा, अशी सूचना ग्राम विकास व पंचायत राज खात्याचे मुख्य सचिव व बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी केली. चिकोडी व निपाणी तालुक्यातील पूर स्थितीची पाहणी केल्यानंतर शहरात आयोजित जिल्हास्तरीय विकास आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
ते म्हणाले, कोयना व इतर धरणातून पुढील काळात पाणी सोडल्यास गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच महाराष्ट्र राज्याशी समन्वय साधावा. यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कर्नाटकाच्या एका अधिकार्याला नेमावे, असे सांगितले.
महापूर व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होत असून 24 तासांत सर्व्हे करावा. तसेच एखाद्या माणसाचा किंवा जनावराचा मृत्यू झाल्यास 48 तासांत आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी सूचना परवेज यांनी केली. बेळगाव जिल्हा मोठा असल्यामुळे पूर काळात स्थानिक कर्मचार्याची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे समन्वयाने काम करावे, असे सांगितले.
पूर आल्यानंतर स्थलांतर करण्यापेक्षा येण्यापूर्वीच नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. बेळगाव जिल्ह्यात घरे पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्थानिक पीडिओ, तलाठ्यांनी अशा घरांना भेट देऊन गरज भासल्यास अशा नागरिकांची राहण्याची पर्यायी व्यवस्था करून द्यावी.
यापूर्वी 2019 साली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. पण योग्य डाटा नसल्यामुळे भरपाई देण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यंदा घरांची पडझड व नुकसानीचा योग्य सर्व्हे करून डाटा तयार करून ठेवावा.
सध्याा उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरणीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पेरलेले वाहून गेले आहे. त्यामुळे कृषी अधिकार्यांनी बियाणे उपलब्ध करून घ्यावे. बियाणे मिळाले नाहीत, अशी एकही तक्रार येता कामा नये, अशी सूचना परवेज यांनी दिली.
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, सध्या कर्नाटकात 1.61 लाख क्युसेक पाणी वाहत असून 2.50 लाख क्युसेक झाल्यास महापूर येतो. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नाही. जिल्ह्यात 30 पूल पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्ग सुरू आहेत. सर्व ठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
नादुरूस्त शाळा व अंगणवाडी दुरुस्ती कार्य त्वरित हाती घ्यावे. 48 तासात दुरुस्ती कार्य व्हावे. यासाठी 2 लाख रुपये त्वरित दिले जातील, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, चिकोडी प्रांताधिकारी माधव गीते, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.