

कारवार : शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी (दि. 29) रात्री उशिरा अचानक आग भडकल्याने गोंधळ उडाला. अग्निशामक दलाने तातडीने आग विझविल्याने जीवितहानी वा मालमत्तेचे फारसे नुकसान झाले नाही. झाडाची सुकी पाने आणि फांद्या जाळण्यासाठी लावलेली आग नियंत्रणाबाहेर जाऊन मुख्य महाविद्यालयाच्या इमारतीकडे पसरल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली अधिक माहिती अशी, कामगारांनी आदल्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारातील एक मोठे झाड तोडले होते. खोड साफ केल्यानंतर त्यांनी वाळलेल्या पानांचा आणि फांद्यांच्या ढिगार्याला आग लावली. जोरदार वार्यामुळे आग भडकून इतरत्र पसरली.
काही वेळातच ती? ? महाविद्यालयाच्या इमारतीपर्यंत पोचली. अलार्म वाजताच कारवार अग्निशामक दल व आपत्कालीन सेवा विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यापूर्वी किंवा जीव धोक्यात येण्यापूर्वी आग पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र, या घटनेमुळे इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
सरकारी परिसरात आग हाताळण्यात झालेल्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवासी आणि महाविद्यालयीन अधिकार्यांनी महाविद्यालय प्रशासन आणि संबंधित विभागांना अशा प्रकारच्या कृती करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.