

विजापूर : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या निवृत्त शिक्षकाच्या डोक्यावर आणि छातीवर वार करून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात घडली. बंदाल गावचे रहिवासी आणि इंडी येथील पंचशील नगरात वास्तव्यास असलेले सिद्धप्पा बसप्पा अंजुटगी (वय ६२) असे मृताचे नाव आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सिद्धप्पा यांची मुलीच्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचे विजापूर येथील भीमाजी ऊर्फ संतोष गणपती शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाला सिद्धप्पा यांचा विरोध होता. ते मुलीला वारंवार समज देत होते. आपल्या संबंधात वडीलच अडथळा ठरत असल्याने ती नाराज होती. तसेच वडील निवृत्तीचे पैसे इतरांना देतात आणि आम्हाला काहीही देत नाहीत, या कारणावरूनही वडील-मुलीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह
१६ ऑगस्ट रोजी एका परिचित व्यक्तीने सिद्धप्पा यांच्या मोबाईलवरून त्यांची मुलगी निकिताला फोन करून इंडी–चडचण रस्त्यावरील पुजारी वसती परिसरातील शेताजवळ रस्त्याच्या कडेला सिद्धप्पा यांचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. निकिता यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता सिद्धप्पा यांच्या डोक्यावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले. मृतदेहाजवळ घरातील बेडशीट तसेच उशीचे कव्हरही आढळून आले.
१५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजल्यापासून १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत हा खून झाल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. सिद्धप्पा यांची मुलगी, भीमाजी ऊर्फ संतोष आणि इतरांनी संगनमत करून सिद्धप्पा यांचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून वाहनातून नेऊन रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.