

बेळगाव, बंगळूर : राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेले काही कैदी मोबाईलवरून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्यांनी या कैद्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे कारागृहामध्ये मोबाईलवर बंदी असताना मोबाईलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहातील अधिकारी अडचणीत आले असून त्यांचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंडलगाबरोबर बळ्ळारी आणि बंगळूरच्या परप्पन अग्रहार तुरुंगातून दहशतवादी संघटनांशी संपर्काचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबररोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व केंद्रीय गुप्तचर संस्थेने कर्नाटकमधील कारागृहात असलेल्या कैद्यांची तपासणी सुरू केली आहे. या कारागृहातील कैद्यांचा दहशतवाद्यांशी संपर्क झाला होता. बळ्ळारी मध्यवर्ती तुरुंगासह परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृह व बेळगाव हिंडलगा कारागृहातील दहशतवादी व कैदी तुरुंगात असताना दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती एनआयएला आढळून आली.
परप्पन व बेळगाव हिंडलगा तुरुंगात 300 हून अधिक दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. काही दहशतवाद्यांचे तुरुंगातून आयसीस, लष्कर-ए-तोयबा, अल-कायदा, जैश-ए-मोहम्मद, एलईटी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. दहशतवादी हमीद शकील मुन्ना हा तुरुंगात असून तो एका बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याने इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या सदस्यांशी संपर्क केला आहे.
तुरुंगातून देशभरात बॉम्बस्फोटांचा कट रचणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी टी. नासीरला सर्व सुविधा व मोबाईल फोन पुरवल्याबद्दल बंगळूर तुरुंगातील एएसआय चांद पाशाला अटक करण्यात आली होती. जन्मठेपेची शिक्षा झालेला दहशतवादी टी. नसीर आयसीस व इतर दहशतवादी संघटनांच्या नेत्यांशी सतत संपर्कात होता. तुरुंगात मोबाईलवर बंदी असूनही अनेक दहशतवादी मोबाईल फोन बाळगतात व परदेशातील दहशतवादी संघटनांशी सतत संपर्कात असतात हे लक्षात आल्यानंतर एनआयएने तपास सुरू केला आहे.
दहशतवाद्यांशी सतत संपर्क
हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या जयेश उर्फ जयेशकांत पुजारी दहशतवादी संघटनेशी सतत संपर्कात असल्याची माहिती एनआयए अधिकाऱ्यांनी गोळा केली आहे. 2015 मध्ये त्याला देशद्रोह, खून, खंडणी व जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. म्हैसूर तुरुंगात असलेल्या जयेशला न्यायालयाच्या आदेशाने बेळगाव हिंडलगा तुरुंगात परत आणण्यात आले. तुरुंगात असताना मोबाईल फोनचा वापर करून दहशतवाद्यांशी संपर्क साधल्याचा आरोप करत तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात 26 नोव्हेंबररोजी बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्याला बेळगाव येथील न्यायालयात हजर करताना त्याने पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या.