

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी राज्याच्या राजकारणात बदल होणार आहेत. कोणाला बढती दिली जाईल, हे माहीत नाही. सर्व काही वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले असून, त्यामुळे खळबळ माजली आहे.
सिद्धरामय्या आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पडद्यामागे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी निवासस्थानी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, राजकारणात नेहमीच एका पातळीपासून दुसऱ्या पातळीवर पोहोचण्याची इच्छा असते.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर, प्रत्येकाला आमदार, नंतर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. माझीही तीच इच्छा आहे. पण नक्की काय होईल हे माहीत नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
त्यानंतर २० नोव्हेंबरपासून सत्ता हस्तांतरणाचा मुद्दा अजेंड्यावर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे समर्थक सत्ता हस्तांतरणाच्या बावतीत उघडपणे नकार देत आहेत. राज्यभरात नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही याबद्दल मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. जनतेने पोलिसांना सहकार्य केल्यामुळे उत्सव सुरळीत पार पडला, असे परमेश्वर यांनी सांगितले.