

अंकली : जुन्या मातीच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक छताचा भाग कोसळून दोन मजूर मातीखाली गाडले गेले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१२) सकाळी अथणी तालुक्यातील कोट्टलगी गावात घडली. या घटनेची नोंद ऐगली पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अथणी तालुक्यातील कोट्टलगी येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मीबाई बसप्पा नंदगोंड या आपल्या जुन्या मातीच्या घराची दुरुस्ती करून घेत होत्या. दुरुस्तीचे काम सुरू असताना मजूर महादेव कृष्णाप्पा बडिगेर (वय 48) आणि सय्यद केंपवाडी (वय 32) हे घराच्या वरच्या भागातील माती काढण्याचे काम करत होते. त्याचवेळी घराचा वरचा भाग अचानक कोसळून दोघांच्या अंगावर पडला. त्यामुळे दोघेही मातीखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे कोट्टलगी गावात शोककळा पसरली असून मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.