KPSC Paper Leak : तब्बल चार परीक्षांचे पेपर लीक

‘ईडी’चे आरोपपत्र : पशूवैद्यांसह पीडीओ, कृषी अधिकारी, अभियंता परीक्षांतही गैरव्यवहार
KPSC Paper Leak
KPSC Paper Leak
Published on: 
Updated on: 

बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोग अर्थात ‘केपीएससी’च्या भरती प्रक्रियेत पशू वैद्याधिकारी परीक्षेसह कार्यकारी अभियंता, कृषी अधिकारी आणि पीडीओ परीक्षांचेही पेपर फुटले होते, असा दावा ‘ईडी’ने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. त्याशिवाय या पेपरफुटी घोटाळ्यात आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याने आपल्या दोन मुलींना ‘केएएस’ बनवण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच दिली होती, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम ५० खाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पेपरफुटीत ‘केपीएससी’चे तत्कालीन अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार, आयएएस असलेले पेपर नियंत्रण अधिकारी ज्ञानेंद्रकुमार गंगवार आणि त्यांचा हस्तक बसवराज कन्नाळे यांची नावे आधीच उघडकीस आली होती. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पशू वैद्याधिकारी परीक्षेचे पेर फुटले. त्याचा तपास ईडी (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) करत आहे. चौकशीदरम्यान ग्रामविकास आणि पंचायतराज खात्यातर्फे घेण्यात आलेल्या सहायक कार्यकारी अभियंता, केएएस गॅजेटेड प्रोबेशनर्स परीक्षा २०२३, पीडीओ आणि सहायक अभियंता २०२४ या तीन परीक्षांमध्येही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार ईडी तपास करत आहे.

पशू वैद्याधिकारी परीक्षेच्या आन्सर की (उत्तर पत्रिका) ज्ञानेंद्रकुमार यांनीच फोडल्याचा आरोप आहे. हस्तक कन्नाळे य़ाच्या माध्यमातून उत्तरपत्रिका उमेदवारांपर्यंत पोहोचवल्या आणि त्या बदल्यास लाच स्वीकारली. त्या लाचेतील रक्कम साहुकार यांनाही दिली. अशाच पद्धतीने पीडीओ, अभियंता आणि कृषी अधिकारी पदांच्या परीक्षांच्याही उत्तरपत्रिका फोडण्यात आल्या, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

आयपीएस अधिकाऱ्याचाही सहभाग

साहुकार आणि गंगवार यांच्या सहभागानंतर आता पेपरफुटीत बंगळूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असलेले आयपीएस अधिकारी चंद्रकांत एम. व्ही. यांचे नावही जोडले गेले आहे. त्यांनी आपल्या दोन मुलींना कर्नाटक प्रशासकीय सेवेत (केएएस) अधिकारी पद मिळवून देण्यासाठी दोन कोटी रुपये दिल्याचे कन्नाळे याने आपल्या जबानीत म्हटले आहे. त्याआधारे चंद्रकांत यांचेही नाव आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. परप्पन अग्रहार कारागृहात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी कन्नाळे याचा जबाब नोंदवून घेतला होता.

चंद्रकांत यांच्या तेजस्विनी आणि पल्लवी या दोन मुलींनी केएएस परीक्षा दिली होती. त्यापैकी एक मुलगी मुलाखतीसाठी पात्र झाली नव्हती. तिला पात्र ठरवून घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची रक्कम देण्यात आल्याचा उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात आहे.

घराजवळ स्वीकारली रक्कम

कन्नाळेच्या जबाबानुसार, ज्ञानेंद्रकुमार यांच्या सूचनेवरून त्याने दोन कोटी रुपये स्वीकारले. आयपीएस अधिकारी चंद्रकांत यांच्या घराजवळ जाऊन ही रक्कम स्वीकारण्याची सूचना ज्ञानेंद्र कुमार यांनी त्याला केली होती. त्यानुसार आपण दोन कोटी रुपये स्वीकारून ज्ञानेंद्र कुमार यांच्याकडे सुपूर्द केल्याचे कन्नाळे याने जबाबात म्हटले आहे. उमेदवारांना परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याच्या उद्देशाने ही रक्कम स्वीकारण्यात आली होती. तसेच, ही रक्कम साहुकार यांच्याकडे देण्याची सूचना ज्ञानेंद्र कुमार यांनी केल्याचेही कन्नाळे याने आपल्या जबाबात नमूद केले आहे.

व्हॉटस्‌ॲप कॉलद्वारे चंद्रकांत आणि त्यांची पत्नी आपल्याशी संपर्क साधत होते. पैशांच्या व्यवहाराबाबत वारंवार फोन करून विचारणा केली जात होती, असाही दावा कन्नाळे याने केला आहे. कन्नाळेच्या जबाबामुळे केपीएससी भरती घोटाळ्यात पोलिस अधिकाऱ्याच्या सहभागाचा मुद्दा चर्चेत आला आहे. चंद्रकांत यांचे नाव आरोपपत्रात आल्याने या प्रकरणातील तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकूण १८ कोटींचा व्यवहार

२०२३ ते २०२६ या काळात आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांचे १५ ते १८ कोटी रुपयांचे व्यवहार हाताळले. त्यात रोकड आणि दागिन्यांचा समावेश होता. ५० ते ८० लाख रुपयांना एका उमेदवाराला एक उत्तरपत्रिका विकली, असे बसवराज कन्नाळेने आपल्या जबानीत म्हटले आहे.