

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व होमस्टेंची नोंदणी पर्यटन खात्याकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व होमस्टे मालकांनी त्वरित पर्यटन खात्याकडे अधिकृतपणे नोंदणी करावी, अशी सूचना खात्याचे आयुक्त डॉ. रामप्रसाद मनोहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने 'कर्नाटक होमस्टे नोंदणी मार्गदर्शक तत्त्वे-२०२५' लागू केली आहेत. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक होमस्टेमालकांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. राज्यात कार्यरत असलेल्या प्रत्येक होमस्टेसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात, आयुक्तांनी अद्याप नोंदणी न केलेल्या सर्व पात्र होमस्टे मालकांना विनाविलंब पर्यटन विभागाकडे अधिकृतपणे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या अर्जांची कडक तपासणी करण्यात येत आहे. ४०० अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी आधीच पूर्ण झाली असून, सध्या जागेच्या पडताळणीचे काम सुरू आहे.
पर्यटन, पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पंचायत यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाकडून प्रत्येक अर्जाची सखोल तपासणी केल्यानंतरच नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रक्रियेत पायाभूत सुविधा, सुरक्षा, स्वच्छता आणि कार्यप्रणालीच्या मानकांचे कठोरपणे मूल्यांकन केले जाणार आहे.
सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आणि संबंधित प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी वैध असेल आणि त्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे अनिवार्य आहे.
ही नोंदणीद्वारे राज्यातील होमस्टेंना अधिकृत मान्यता देण्यात येईल. यामुळे पर्यटकांना विश्वसनीय आणि सुरक्षित निवास व्यवस्था मिळणार आहे. त्याचबरोबर खात्याकडे अधिकृत डेटाबेस राखण्यासही मदत होईल. नोंदणीकृत होमस्टेंना सरकारच्या सुरक्षा आणि कार्यप्रणालीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आयुक्त डॉ. मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.