Karnataka Forest Encounter: वन कर्मचाऱ्यांच्या चकमकीत तीन शिकारी ठार

चामराजनगर येथील हनूर तालुक्यातील घटना : गावकर्‍यांचे आंदोलन; चौकशीची मागणी
Karnataka Forest Encounter: वन कर्मचाऱ्यांच्या चकमकीत तीन शिकारी ठार
Published on
Updated on

चामराजनगर : वन कर्मचारी व शिकाऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन शिकारी ठार झाले. चामराजनगर येथील हनूर तालुक्यात शाग्य गावाजवळ असलेल्या मरियमंगला बीटमध्ये शुक्रवार दि. १५ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या चकमकीतील मृतांची ओळख पटली असून अँथोनी (वय ५०, रा. मारियमंगल), जोसेफ पीटर (४२, रा. जगन्नाथडोड्डी) व कुमार (३३, रा. लासरदोड्डी) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईदरम्यान एकजण पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हनूर तालुक्यातील कावेरी वन्यजीव अभयारण्यात मारियमंगल बीटमध्ये काहीजण वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शुक्रवारी रात्री जंगलात आल्याचे मारियमंगल येथे गस्त घालत असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. शिकाऱ्यांना पाहताच वन कर्मचारी त्यांना पकडण्यास पुढे सरसावले असता शिकाऱ्यांनी वनरक्षकांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. तेव्हा वनरक्षकांनीदेखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत तीन शिकारी जागीच ठार झाले आहेत. त्या तिघांचे मृतदेह तत्काळ म्हैसूर येथील के. आर. रुग्णालयात हलवण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात आले आहे.

चकमकीत तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत गावकऱ्यांनी शाग्य येथील उपविभागीय वन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड केली. तसेच परिसरात थांबविण्यात आलेल्या दुचाकीचेही नुकसान केले. संतप्त आंदोलकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी. शिवाय कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी तळ ठोकला असून गावकऱ्यांची समजूत घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सात दिवसांत अहवाल देण्‍याचे आदेश

या अभयारण्यात गाय शोधायला गेलेल्यांना शिकारी असल्याचे समजून वन कर्मचार्‍यांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. यासंदर्भात अँथोनी यांची पत्नी लुर्दमेरी यांच्या तक्रारीवरून चामराजनगर येथील हनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून ७ दिवसांच्या आत तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news