

बंगळूर : ‘विक्रम मोडण्यासाठी राजकारण करत नाही, तर समाजातील असमानता दूर होईपर्यंत लोकांसाठी लढत राहणार आहे. समाजात अजूनही असमानता असून, जोपर्यंत असमानता दूर होत नाही आणि सर्वांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढू’ असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
मंगळवारी (दि. 6) सिद्धरामय्यांनी कर्नाटकाचे सर्वाधिक काळ म्हणजेच 2 हजार 795 दिवस मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम केला. याआधी हा विक्रम देवराज अर्स यांच्या नावावर होता. ते 2 हजार 794 दिवस मुख्यमंत्री पदावर होते. या विक्रमानिमित्त मंगळवारी म्हैसूर येथील त्यांच्या निवासस्थानी चाहते, समर्थक आणि पक्ष नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर सिद्धरामय्या पत्रकारांशी बोलत होते. देवराज अर्स आणि मी दोघेही म्हैसूरचे. दोघेही दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलो आहोत. अर्स हे 1972 ते 1980 पर्यंत सतत राज्याचे मुख्यमंत्री होते. मी नाटी कोळी (गावरान कोंबडी) आणि रागी मुद्दे खाल्ले आहे. गावकऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे. मी मुख्यमंत्री असल्याने मला काही प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.