

बंगळूर : दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. शिवाय जुन्या मंत्र्यांपैकी दोन नाराज मंत्र्यांच्या खात्यांत बदल करण्यात आला. नव्या खातेवाटपानुसार लक्ष्मण सवदी यांना सहकार खाते देण्यात आले आहे. तर संतोष लाड यांना कामगार खाते मिळाले आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री बी. नागेंद्र यांनाही नियोजन-सांख्यिकी खाते देण्यात आले आहे. तर महिला-बालकल्याण खाते कुणालाही देण्यात आलेले नाही. वाटप न झालेली सगळी खाती मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली आहेत.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अर्थ, मंत्रिमंडळ कामकाज, कामगार-प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर, माहिती, कायदा, न्याय आणि मानवाधिकार, संसदीय कामकाज आणि कायदे, एपीएमसी नगर आणि ग्राम नियोजन आयोग, बीडीए आणि बीएमआरडीएअंतर्गत सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ही खाती स्वतःकडे ठेवली आहेत.
३ जून रोजी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबतच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर के. एच. मुनियप्पा यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले होते. पण त्याबद्दल ते नाराज होते. त्यामुळे त्यांच्या खात्यात बदल करून समाज कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे. मुनियप्पा यांनी समाजकल्याण खात्यासाठी आग्रह धरला होता. तर रामलिंग रेड्डी यांना जलसंपदा खाते बदलून वन, पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान खाते देण्यात आले. याशिवाय यू. टी. कादर यांना आरोग्य खात्याबरोबरच अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
नव्या मंत्र्यांचे खातेवाटप असे
लक्ष्मण सवदी...............सहकार
विजयानंद काशप्पनवर....लघु उद्योग, सार्वजनिक उपक्रम
संतोष लाड...................कामगार आणि रोजगार
नरेंद्र स्वामी..................कृषी
मधु बंगारप्पा................प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
बसवराज रायरेड्डी...........उच्च शिक्षण
यू. टी. कादर...............आरोग्य, अल्पसंख्याक, हज-वक्फ
शिवलिंगेगौडा...............उत्पादन शुल्क
जमीर अहमद खान........गृहनिर्माण
रामलिंग रेड्डी.................वन, पर्यावरण
रुद्राप्पा लमाणी............साखर आणि कापड
एस. एस. मल्लिकार्जुन...खाण आणि भूविज्ञान, फलोत्पादन
रिझवान अर्शद..........अन्न-नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार
के. एच. मुनियप्पा..........समाज कल्याण
शिवराज तंगडगी...........मागासवर्गीय, कन्नड आणि संस्कृती
टी. रघुमूर्ती.................अनुसूचित जमाती कल्याण
डॉ. अजय सिंग............लघु पाटबंधारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान
चेलुवरायस्वामी.........मोठे आणि मध्यम सिंचन
पुट्टरंगशेट्टी................पशुसंवर्धन आणि रेशीम उद्योग
बसवंतप्पा..............धर्मादाय, मत्स्यव्यवसाय, बंदरे
एच. सी. बालकृष्ण.....नगर प्रशासन
बी. नागेंद्र.................नियोजन आणि सांख्यिकी