कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : भाजप, काँग्रेस बंडखोर निजदच्या संपर्कात 

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : भाजप, काँग्रेस बंडखोर निजदच्या संपर्कात 
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीसाठी सारेच पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करत असताना, भाजप आणि काँग्रेसकडून तिकिटे न मिळालेले नेते निधर्मी जनता दलाच्या संपर्कात आहेत. निजदचे नेते एच. डी. कुमारस्वामीही या नेत्यांना तिकिटे देण्यास इच्छुक असून, त्यामुळे निजदचे बळ वाढेल, असे कुमारस्वामींनी म्हटले आहे. त्याचबरोबर बेळगाव उत्तरची उमेदवारी हुकलेले आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिल्याचे समजते. तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी शुक्रवारी बंगळुरात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपची उमेदवारी हुकलेले यमकनमर्डीचे इच्छुक मारुती अष्टगी अपक्ष लढण्याची शक्यता आहे.

भाजपच्या 12 आमदारांना आतापर्यंत उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. त्यासह काँग्रेसनेही काही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले आहे. बेळगाव उत्तरमधून उमेदवारी हुकलेले आमदार अनिल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुडीगेरेचे खासदार कुमारस्वामी यांनी आपल्या मतदारसंघात भाजपची उमेदवारी न मिळाल्याने आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते जेडीएसमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसेच तुमकूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी मंत्री सोगडू शिवण्णा यांनीही जेडीएसकडे मोर्चा वळवला आहे.

जेवरगी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीपासून वंचित राहिलेले माजी आमदार दोड्डाप्पा गौडा-पाटील यांनीही कुमारस्वामींची भेट घेतली. माजी नगरसेवक एन.आर. रमेश यांना चिक्कपेट आणि जयनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी हवी होती. दोन्ही मतदारसंघांत भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी जेडीएस नेत्यांशी चर्चा केली आहे. जेडीएसमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सौंदत्तीमधून काँग्रेसकडून इच्छुक असलेले अजय चोप्रा यांनीही निजदमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर कित्तूर मतदारसंघातून इच्छुक असलेल्या इनामदार कुटुंबीयांनीही काँग्रेसविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावला आहे.

एस. अंगारा यांची राजकारणातून निवृत्ती

विद्यमान मत्स्यसंगोपन आणि बंदर मंत्री यांना भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. ते सुळ्या विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले. सुळ्यामध्ये आपल्या घरी पत्रकारांशी बोलताना अंगारा म्हणाले, 30 वर्षे भाजपसाठी इमानदारीने काम केले. इतकी वर्षे इमानदारीने काम केल्यानंतरही पक्षाने तिकीट नाकारले आहे, याचे दुःख वाटत आहे.

भाजपची दुसरी यादी जाहीर

पहिली 189 जणांची यादी जाहीर करणार्‍या भाजपने बुधवारी रात्री 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यातही सात आमदारांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या यादीनंतरही भाजपमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आतापर्यंत भाजपने दोन टप्प्यांत 212 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे समजते.

पहिल्या दिवशी 221 अर्ज

विधानसभेसाठी गुरुवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार असे पहिल्या दिवशी राज्यभरात 221 अर्ज दाखल झाले. 221 उमेदवारांपैकी 197 पुरुष तर 24 महिला आहे. भाजपकडून 24, काँग्रेस 26, निजद 12, आप 10, बसप 1, अनोंदणीकृत पक्षाकडून 100 आणि 45 अपक्ष उमेदवारांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी अर्ज भरले.

कोरोना मार्गसूचीचे पालन आवश्यक : आयोग

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असतानाच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना मार्गसूचीचे पालन आवश्यक असल्याचे कळवले आहे. निवडणुकीदरम्यान आरोग्य खात्याच्या कोरोना मार्गसूचीचे पालन करण्यात यावे, जिल्हा पातळीवर कोरोना प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात येणार असून सर्वेक्षण अधिकारी, जिल्हाधिकार्‍यांनी समितीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आयोगाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news