

कारदगा : चार दिवसांपासून तळकोकणासह परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कारदगा, खडकोळ, बारवाड बंधारेवजा पूल सोमवारी पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे.
मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. परिसरातही संततधार सुरू असल्याने बारवाड व कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा, कारदगा-भोज मार्गावरील कारदगा बंधारा, भोजवाडी-हुन्नरगी मार्गावरील खडकोळ बंधार्यावरुन पाणी वाहत आहेत.
त्यामुळे वळशाचा प्रवास करावा लागत आहे. तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, पुराच्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी स्थानिकांची गर्दी बंधार्यांच्या आसपास दिसत आहे.