

बेळगाव : न्यायालयात बेंच क्लार्कची नोकरी मिळवून देतो असे सांगून बापलेकाची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. 9) खडेबाजार पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विनायक निंगाप्पा दुलाई, निंगाप्पा गोलप्पा दुलाई, कमलव्वा निंगाप्पा दुलाई (तिघेही रा. समर्थनगर) व ब्रह्मा यशवंत मेळवंकी (रा. महावीर कॉलनी, कणबर्गी) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी वृषभ दीपक गावडे (वय 30) व दीपक गावडे (वय 65, दोघेही रा. शेरी गल्ली, बेळगाव) यांनी उपरोक्त संशयितांविरुद्ध खडेबाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती.
या चौघांनी धारवाड उच्च न्यायालयात बेंच क्लर्क म्हणून नोकरी मिळवून देतो, असे सांगून फिर्यादींकडून रक्कम घेतली होती. मात्र, नोकरीही दिली नाही व रक्कमही परत केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. खडेबाजार पोलिस तपास करत आहेत.