

बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकार कुणा एका व्यक्तीमुळे सत्तेत आलेले नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी टोला लगावला आहे. जारकिहोळी रविवारी (दि. 23) शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आले कारण अनेक नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले. फक्त एकाच व्यक्तीने सरकार सत्तेत आणले, असे म्हटले जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही. डी. के. शिवकुमार यांनी 140 आमदार माझे आहेत, असे सांगत सरकारवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला आहे.
गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे, मीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे या विधानावर पालकमंत्री जारकिहोळी म्हणाले, गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची पात्रता आहे. 2013 मध्ये राज्यात सरकार सत्तेत आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. परमेश्वर यांच्या विधानात काही चूक नाही. काँग्रेस पक्षाला सर्वाधिक पाठिंबा देणारे लोक अनुसूचित जाती आणि जमातीतील आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र व विधान परिषद सदस्य यतींद्र सिद्धरामय्या यांनी रविवारी हुबळीत दाखल होत आमदार कोनारेड्डी व प्रसाद अब्बय्या यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अब्बय्या म्हणाले, यतींद्र यांची सौहार्दपूर्ण भेट झाली. राजकारणावर चर्चा झाली नाही.